सोमवार, २३ फेब्रुवारी, २०२६

गोष्ट

साने गुरुजी यांनी लहान मुलांना देवाघरची फुले असे म्हंटले आहे. त्यांचे निर्मळ मन हे फुलां प्रमाणे पावित्र आणि शुद्ध असते. मुलांची हीच निरागसता आणि शुद्धता...आता कुठेतरी हरवत चालली आहे.  अशा लहानग्यांच्या गोड हसण्यामध्ये ईश्वराचे रूप सामावलेले आहे.  पण सध्या ... आपल्या गोजिरवाण्या घरात मोबाईल, लॅपटॉप, स्मार्ट टीव्ही यासारखी खेळणी हातात आल्यामुळे.... ते थोडा वेळ का होईना ....कधीतरी एखाद्या दिवशी webseries किंवा भयानक गोष्टी त्यावर बघतात.  आणि या सगळ्याचा मुलांच्या मनावर खोल परिणाम होतो.  झोप न लागणे किंवा वाईट स्वप्नं पडून ... दचकून जागे होणे, झोपेत बडबड करणे, घाबरणे असे प्रकार पहायला मिळतात. मुले दिवसभर जे बघतात किंवा ऐकतात ते मेंदूत ... मनात साचत जातं. मनी वसे ते स्वप्नी दिसे. मुलांचा दिवसभराचा जगाचा अनुभव किती negative आहे हे आपल्याला कळत नाही.  

स्वप्नं म्हणजे नेमके काय? तर आजच्या अनुभवातून उद्याची कल्पना करणे.  त्यामुळे मुले जे दिवसभर पाहतात...ऐकतात त्याचीच कल्पना करतात.  म्हणून रोज रात्री झोपताना मुलांना एक सुंदर गोष्ट सांगितली गेली पाहिजे.  आज जगाचा अनुभव थोडा जरी वाईट आला तरी उद्याचा दिवस हा सुंदरच असणार आहे.  हे त्यांच्या नेणीवेत कुठेतरी झिरपत राहीलं पाहिजे.  रोजची गोष्ट ही त्यांना सुंदर अशा जगात घेवून जाते. आणि मुलांचे मन आशावादी होते.  

मोबाईल वर असे अनेक reels किंवा प्रसंग दाखवले जातात. जे नकारात्मक असतात. त्याचा परिणाम मुलांच्या अभ्यासावर होतो.  भितीदायक प्रसंगामुळे त्यांना झोपेच्या समस्या निर्माण होतात.  तसेच चुकीच्या सवयी ना बळी पडू शकतात. मुलांना गोष्ट ऐकवणे म्हणजे त्यांच्या बुद्धीचा आणि कल्पना शक्तीचा मार्ग मोकळा करण्यासारखे आहे.  

ससा आणि कासवाची गोष्ट....चिकाटी आणि संयम कसा असावा हे शिकवते.  कोल्हा ... करकोचा च्या गोष्टीमध्ये कराल तसे भराल हे समजते.  हुशार मुंगूस या गोष्टीमध्ये  ... रागाच्या भरात घेतलेला निर्णय हा चुकीचा असतो.  याची त्यांना प्रचिती येते.  लाकूडतोडया ची गोष्ट प्रामाणिकपणा शिकवते. 

मुलांना गोष्टी सांगणे हे त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत गरजेचे आहे. गोष्टी ऐकताना ... एका जागी स्थिर राहून लक्ष दिले जाते.  त्यामुळे मुलांची एकाग्रता वाढते.  तसेच ... त्यांचा शब्दसंग्रह व विचार करण्याची क्षमता सुद्धा वाढते. रोज थोडा वेळ काढून अशा प्रकारे तुम्ही मुलांशी संवाद साधू शकता. गोष्टीतल्या पात्रांशी एकरूप होवून...अगदी रंगवून तुम्ही गोष्ट ऐकवली तर त्यांचा सकारात्मक दृष्टिकोन वाढतो. काय चूक आणि काय बरोबर हे समजते.  नैतिक मूल्ये आणि आपल्या संस्कारांची रुजवण होते. फक्त एका गोष्टीमुळे तुमचे आणि त्याचे नाते घट्ट होते. 


सोमवार, २ फेब्रुवारी, २०२६

उसंत

'मनाचा ब्रेक हा उत्तम ब्रेक' असे वाचण्यात आलेच असेल. त्यातला ब्रेक हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. जसा गाडीच्या स्पीडला अधनं मधनं ब्रेकची गरज असते. तसेच माणसाच्या रुटीनला सुद्धा ब्रेकची गरज असते... हा रुटीन मधला ब्रेक... तसे सगळेच घेताना दिसतात पण रोजची किंवा दोन चार दिवसांनी मिळणारी उसंत मात्र घेताना दिसत नाही. कारण एकच आहे माणूस धावत सुटला आहे. पूर्वी नोकरी 9 ते 5 या वेळेत असायची त्यामुळे कुटुंबाचा सहवास मिळायचा...न चुकता रोजचा संवाद, एकमेकांसोबत वेळ घालवणे होते.  थोडा फेरफटका ,मित्रांशी, शेजाऱ्यांशी संवाद होता. चालणं होत होतं... त्यामुळे माणसं भेटायची. बस आणि ट्रेनमुळे ग्रुप जमले होते.  त्यांचे पत्त्यांचे डाव, गप्पाटप्पा, अंताक्षरी यासारखे अनेक कार्यक्रम व्हायचे. माणूस माणसात होता.. त्यामुळे तो खिदळायचा, हसायचा, खेळायचा, भडाभडा बोलायचा... आत्ता जगायची समीकरणे थोडी बदलली आहेत. माणूस कार मध्ये असो ट्रेनमध्ये असो किंवा बस मध्ये  मोबाईल हातात आल्यामुळे माणसं बोलायला विसरली आहेत... डोळे हे मोबाईलवर असल्यामुळे समोरचं बघणं विसरली आहेत... आणि कानात हेडफोन असल्यामुळे ऐकायला विसरली आहेत. 


आजकाल job मध्ये target असतात. त्यामुळे कामाचे तास वाढलेत. माणसाकडून मशीन सारखे काम करण्याची अपेक्षा केली जाते... त्यामुळे आठ तासाचे 18 तास झालेले आहेत. Family time साठी weekend ची वाट पाहावी लागते... फ्रेंड सर्कल बरोबर picnic arrange केली जाते. सध्या आवड असेल तरी सवड काढता येत नाही... सवड मिळाली तरी मोबाईल ला वेळ दिला जातो. निसर्गाच्या सानिध्यात गेल्यावर निसर्ग ... डोळ्यात साठवता आला पाहिजे ... देव दर्शनाला गेल्यावर ... देवाला डोळे भरून पाहता आलं पाहिजे ... पण सेल्फी आणि फोटो काढण्याच्या नादात आपण मनाची एकाग्रता हरवून बसलो आहोत.


80 आणि 90 च्या कालावधीत किंवा त्याच्या आधी आवडीच्या गोष्टीसाठी वेळ काढला जात होता. एकत्र टीव्ही पाहणे, क्रिकेटची मॅच बघणे , सिनेमा पाहणे, पुस्तक वाचणे, magazine, दिवाळी अंक, गोष्टीची पुस्तक ,पेपर वाचणे, एकत्र फिरायला जाणे, वर्षभरातले सगळे सण ... उत्सव एकत्र साजरे करणे,  चाळीतल्या किंवा सोसायटीच्या कार्यक्रमात सहभागी होणे,  घरातला उत्सव साजरा करता करता मंडळाचा उत्सवातला... उत्साह टिकवणे, मार्केटमध्ये जाणे, मित्राच्या घरी पत्त्याचा डाव खेळणे, सुट्टीत गावाला जाणे आपल्या माणसांना भेटणे, फोटोचे अल्बम बघणे, रेडिओ वरची गाणी ऐकणे, गप्पांची देवाण-घेवाण आणि विचारांची clarity होती. टीव्हीवरील आवडीचे कार्यक्रम पाहणे, खेळणे, लोळणे, झोपणे, चालणे, ऐकणे, बघणे, बोलणे या क्रिया रोजच्या रोज होत्या.


सध्या असे आहे की ... कामातून थोडीशी फुरसत मिळाली की मोबाईल हातात घेतला जातो. पूर्वी हातात वेळ होता आणि घरातल्या माणसाची ओढ होती. आता हातात मोबाईल आल्यामुळे... ती ओढ मोबाईलला connect झाली आहे. बराच वेळ मोबाईल बघितला नाही की चुकल्यासारखे होते.  त्यामुळे माणसा ... माणसामधील संवाद हरवत चालला आहे. कामापुरते बोलले की झाले...कुटुंबाशी, मित्रांशी संवाद होताना दिसत नाही. अनेक मिनिंग लेस आणि फालतू रील्स scroll होतात. त्यात आपला बराच वेळ वाया जातो हे आपल्याला कळत सुद्धा नाही. त्यात चांगल्या रिल्स पण येत असतात. सुमन कल्याणपूरकर याचे सुंदर भावगीत, पु.ल. चा  विनोद, किशोर कुमार च्या आवाजातलं ( ए मेरे दिल सुना कोई कहानी ) गोड संगीत... पण scroll करत असताना आपल्याला थांबायचं नसतं... त्यामुळे थोडं थांबा... श्वास घ्या... प्रसन्न हसरी सकाळ... पक्षांचा किलबिलाट... मंदिरातला घंटा नाद... हिरवीगार झाडं... रंगीबेरंगी फुलं... एखादा फेरीवाला... माणसाच्या गर्दीत हरवलेला सूर्योदय आणि सूर्यास्त... अधून मधून दिसणारी लहान बाळ...  त्यांचे पाणीदार डोळे, गोड हास्य... नकळत दिसणारे आकाश... रात्रीचे चांदणे... कधी कधी दिसणारा चंद्र... एखादे रंगीत फुलपाखरू उडत असते आजूबाजूला.. पण आपले मात्र लक्ष नसते. दिवसातला  मिळणारा  मोकळा वेळ आपण फक्त मोबाईल ला देतो.  सतत scroll केल्यामुळे आपली स्मरणशक्ती आणि एकाग्रता कमी होते.  स्क्रीन टाईम चा एक विशिष्ट टाईम असणे गरजेचे आहे. कारण मोबाईल ही गरज राहिली नसून व्यसन  झाले आहे. याचा परिणाम म्हणजे आपण... आपली सुंदर आणि पुरेशी झोप सुद्धा घेत नाही... त्यामुळे busy schedule मधून उसंत मिळाली की मोबाईलला दूर ठेवा... आणि स्वतःला मोकळीक द्या.





सुवर्णमध्य

आपल्याला आवडणाऱ्या सगळ्याच वस्तू मिळतात ... असे कधी होत नाही. म्हणजे आमच्या लहानपणी आम्हाला जे हवे असायचे त्याला ' नाही ' हा शब्द नेहमी ऐकावा लागायचा. आजकाल मुलांना नाही बोलले जात नाही. उलट त्यांच्यासमोर options ठेवले जातात.  अच्छा... तुम्हाला हे हवे असेल ... तर हे घ्या ... नाहीतर ते घ्या ... कधी कधी  नको असताना सुद्धा त्यांना अशा बऱ्याच गोष्टी पुरवल्या जातात.  ज्याची खरचं काही गरज नसते. "आम्हाला नाही मिळाले...निदान आमच्या मुलांना काही कमी पडायला नको."  असा विचार आजचे अनेक पालक करताना दिसतात.  ते हा विचार करत नाही.  त्यांना जे काही मिळाले नाही त्याने आयुष्यात फारसा फरक पडलेला नाही. त्यावेळी मोठ्या बहिण...भावांचे कपडे, खेळणी, पुस्तके ही लहान भावंडे वापरायची.  त्यात कोणताही कमीपणा नव्हता.  
जे गरजेचे आहे तेच मुलांना दिले जात होते.  हातात आलेले पैसे हे मोजून मापून खर्च केले जायचे. त्याची व्यवस्थित आधीच यादी करून महिन्याचा हिशोब मांडला जायचा.  त्यामुळे पैशाची वारे माप उधळपट्टी होत नव्हती. वर्षातला मोठा सण दिवाळी, येणारा वाढदिवस आणि जवळच्या नातेवाईकाचे लग्न अशाच वेळी नवीन कपड्यांची खरेदी होत असे. 
आजकालच्या सोशल मीडियाच्या जमान्यात फोटोत ... आपले कपडे repeat न होण्याचा trend निघाला आहे. त्यामुळे सतत कपड्यांची खरेदी  केली जाते. आमच्या वेळी Sweegy, zomato, domino's  चे पर्व नव्हते.  त्यामुळे आईच्या हातचे सुग्रास जेवण आणि बाबांनी कधी ... कधी आणलेला खाऊ यावरच आम्ही ताव मारायचो.  त्यावेळी आई फार काही पंचपक्वान्न  बनवत नव्हती. पण तरीही जे काही ती करायची त्याची चव अजूनही आमच्या जिभेवर रेंगाळते आहे. मॉल सिस्टीम, ऑनलाइन ॲप मध्ये शॉपिंग वर ताबा नाही. आणि स्विगी झोमॅटोमुळे खाण्यावर ताबा नाही. अशी सध्याची परिस्थिती आहे.  क्रेडिट आणि डेबिट कार्ड आणि स्कॅनर मुळे पैसे हवेतले हवेत कुठे विरून जातात. हे कळत सुद्धा नाही. ज्या वस्तू खरंच गरजेच्या आहेत त्या न घेता वारे माप शॉपिंग केली जाते मग ती कपड्यांची असो की आणखीन कोणती असो. 

आपल्या दैनंदिन गरजा म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा आणि शिक्षण, आरोग्य हा आवश्यक खर्च सांभाळताना आपल्या मध्यम वर्गीय समाजाची दमछाक होते. बदललेल्या जीवनशैली मुळे अनावश्यक खर्चाचे ओझे वागवावे लागते. सोशल मीडिया आणि वाढत्या गरजा मुळे अनावश्यक खर्च वाढला आहे. जसे की महागडे गॅझेट, बाहेर खाणे, shopping त्यामुळे पैशाची बचत आणि खर्चाचा ताळमेळ साधला जात नाही.  अन्नधान्य, पेट्रोल, wifi, वीज, गॅस हे महाग झाल्यामुळे हा घर खर्च वाढला आहे. आवश्यक खर्च तर आपण टाळू शकत नाही. पण अनावश्यक खर्च मात्र टाळणे आपल्या हातात आहे. मासिक उत्पन्न असेल त्याप्रमाणे आपले बजेट ठरवणे.  आवश्यक ती बचत करणे. आजच्या काळात बचत करणे,  गुंतवणूक करणे आवश्यक झालेले आहे. जेणेकरून भविष्यातील आर्थिक गरजा पूर्ण करता येतील. आपल्या आवश्यकतेनुसार आणि बजेटनुसार खरेदी करता आली पाहिजे. 
मध्यमवर्गीय माणसांना तडजोड ही करावी लागते. आपले मासिक उत्पन्न जेवढे आहे .. त्याप्रमाणे बजेट ठरवणे हे अपरिहार्य आहे.  पण तडजोड हा शब्द  कानाला कुठेतरी खटकतो. त्यापेक्षा दुसरा एकच शब्द आहे. तो म्हणजे सुवर्ण मध्य ... हा छान वाटतो.  तर जे बजेटमध्ये आहे ते मनाला कधी कधी पटत नाही. आणि जे मनाला पटतं ते बजेटमध्ये बसत नाही. अशी परिस्थिती आली की सुवर्णमध्य काढावा.   

गोष्ट

साने गुरुजी यांनी लहान मुलांना देवाघरची फुले असे म्हंटले आहे. त्यांचे निर्मळ मन हे फुलां प्रमाणे पावित्र आणि शुद्ध असते. मुलांची हीच निरागसत...