रविवार, ७ जुलै, २०२४

उन्हाळा


शाळेत असताना "माझा आवडता ऋतू " असा निबंध लिहायचा असेल की बरेच जण हिवाळा किंवा पावसाळा या दोन ऋतू बद्दल भरभरून लिहतात.  उन्हाळा हा ऋतू फार कमी जणांना आवडतो.  या ऋतूचे स्वागत सोडा...तो कधी संपेल याची सगळे वाट बघत असतात.  बाहेरचे  उन्हाचे चटके आणि घरातला उकाडा अगदी नकोसा करणारा हा उन्हाळा .... दोन ऋतू मधला एक छान सुवर्णमध्य आहे. एवढे मात्र खरे!

आमच्या वेळी मुलांना शाळेच्या सुट्ट्या लागल्या की समजायचं की उन्हाळी सुट्टी (summer vacation) चालू झाली. हल्ली एप्रिल महिन्यात शाळा चालू  होतात. त्यामुळे मुलांच्या सुट्टीचा कालावधी तसा कमी होत चाललाय. तरीही या सुट्ट्या मध्ये आपण अनेक आवडीच्या आणि सवडीच्या गोष्टी करत असतो. जशा बायका ...वर्षभर पुरवणी साठी....वाळवणीचे अनेक प्रकार करून ठेवतात  तसेच routine life मध्ये करता न....येणार्‍या अनेक मजेशीर गोष्टी करायला.... फक्त या सुट्टीतच खूप वेळ मिळतो. 

हल्ली summer vacation म्हणजे... जग फिरायला जाणारी हौशी family....आणि आमच्या साठी उन्हाळी सुट्टी म्हणजे....मामाच्या गावाला जायचे. आई .... बाबाच्या गावी जाऊन...त्यांच्या बालपणीच्या आठवणीत...त्यांना रमताना बघून...आपण त्यांच्या सोबत असायला हवे होते...असे वाटायचे.  

उन्हाळा आला की तो सोबत चिंच, आंबा, फणस, करवंद  , जांभूळ असा गोड रानमेवा घेवून येतो.  आम्ही आंबा कधी फोडी करून खाल्ला नाही...हलक्या हाताने....पिळून...आधी गोड रसाचा आस्वाद घेत...आंब्याची कोय...आणि त्याची साल...अगदी चाटून...पुसून फस्त करायचो. तांबा...पितळेच्या भांड्याची भातुकली आणि टिंग..टिंग बेल वाजली की धावत जाऊन बर्फाचा रंगीबेरंगी गोळा खाण्याची मजा काही औरच होती. आजोबा आणि आजीचे ज्ञानात भर पाडणारे अनेक किस्से आणि गोष्टीने कान तृप्त होत असत. कवड्या, सापशिडी, कॅरम, नवा व्यापार सारखे घरगुती खेळ... भावंडांमध्ये खेळण्याची मजा आणि त्यावरुन होणारी भांडणे म्हणजे नुसता गोंधळ असायचा. मामाचं घर पाहुण्यांनी फुलून आलं की आम्हा लहानग्यांची रवानगी अंगणात होत असे.  Sun stroke आणि Hit wave असे त्यावेळेस काहीच नव्हते.  मोकळ्या अंगणात, चांदण्याच्या प्रकाशात गप्पा गोष्टींना अगदी उधाण येत असे. 

 लग्न समारंभातील...कुटुंबाचा... प्रेमळ मैत्रीचा सहवास, कोकिळेचे मंत्रमुग्ध स्वर, मामाच्या अंगणातला भारून टाकणारा मोगऱ्याचा सुगंध आणि सुंदर बहरलेला गुलमोहर पाहून कळायचं की फुलण्यासाठी परिस्थिती नाही तर मनस्थिती भक्कम असावी लागते. अशी ही प्रेमळ सहवासाची सुट्टी संपत आली तरी त्याची गोडी आम्हाला वर्षभर पुरायची.

आता हे दिवस हरवत चालले आहेत. Mobile आणि fast food ने माणसांना भुरळ पाडली आहे.  प्रत्येक माणसाचे जग वेगळे झाले आहे.  स्वतंत्र room, गाडी आणि त्यात  A.C. असेल तर एकमेकांच्या room मध्ये जाण्यासाठी...घरातल्या माणसांना....दार ठोठवावे लागते. मना बरोबर room चे दार ही माणसांनी गच्च बंद करून ठेवली आहेत.  म्हणजे आपणच आपल्या भोवती भिंती घालून ठेवल्या आहेत.  ऊन म्हणजे काहीली, झळ असे कुठेतरी मनावर बिंबवले गेले आहे. पण त्यातील  चैतन्य कोणालाच दिसत नाही.  पावसाळा हा नवीन पालवी घेवून येतो, हिवाळा हा उबदार थंडी घेवून येतो आणि उन्हाळा तेजस्वी सूर्य प्रकाश घेवून येतो...निसर्ग आपल्या ऋतु चक्राचा समतोल अगदी छान सांभाळतो.  फक्त माणसाला निसर्गाशी जुळवून घेणे जमत नाही. मग त्याचे खूप उलट...सुलट परिणाम आपल्याला भोगावे लागतात. 

खरं सांगायचं म्हणजे.... कडक उन्हाच्या झळा सोसल्या खेरीज पाहिल्या पावसाचा आनंद नाही घेता येत...आयुष्याच पण असचं आहे ना...उकाडा असह्य झाल्यानंतर वाऱ्याची येणारी हलकीशी झुळूक सुद्धा...आनंद देऊन जाते.  कृत्रिम पणे फक्त...सुखाचा आभास निर्माण करता येतो...सुख नाही.  अशा कृत्रिम सुखाची सवय झाली की...मग...खऱ्या सुखाचा आनंदच घेता येत नाही. 


















1 टिप्पणी:

उसंत

'मनाचा ब्रेक हा उत्तम ब्रेक' असे वाचण्यात आलेच असेल. त्यातला ब्रेक हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. जसा गाडीच्या स्पीडला अधनं मधनं ब्रेकच...