बुधवार, ३१ डिसेंबर, २०२५

उसंत

'मनाचा ब्रेक हा उत्तम ब्रेक' असे वाचण्यात आलेच असेल. त्यातला ब्रेक हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. जसा गाडीच्या स्पीडला अधनं मधनं ब्रेकची गरज असते. तसेच माणसाच्या रुटीनला सुद्धा ब्रेकची गरज असते... हा रुटीन मधला ब्रेक... तसे सगळेच घेताना दिसतात पण रोजची किंवा दोन चार दिवसांनी मिळणारी उसंत मात्र घेताना दिसत नाही. कारण एकच आहे माणूस धावत सुटला आहे. पूर्वी नोकरी 9 ते 5 या वेळेत असायची त्यामुळे कुटुंबाचा सहवास मिळायचा...न चुकता रोजचा संवाद, एकमेकांसोबत वेळ घालवणे होते.  थोडा फेरफटका ,मित्रांशी, शेजाऱ्यांशी संवाद होता. चालणं होत होतं... त्यामुळे माणसं भेटायची. बस आणि ट्रेनमुळे ग्रुप जमले होते.  त्यांचे पत्त्यांचे डाव, गप्पाटप्पा, अंताक्षरी यासारखे अनेक कार्यक्रम व्हायचे. माणूस माणसात होता.. त्यामुळे तो खिदळायचा, हसायचा, खेळायचा, भडाभडा बोलायचा... आत्ता जगायची समीकरणे थोडी बदलली आहेत. माणूस कार मध्ये असो ट्रेनमध्ये असो किंवा बस मध्ये  मोबाईल हातात आल्यामुळे माणसं बोलायला विसरली आहेत... डोळे हे मोबाईलवर असल्यामुळे समोरचं बघणं विसरली आहेत... आणि कानात हेडफोन असल्यामुळे ऐकायला विसरली आहेत. 


आजकाल job मध्ये target असतात. त्यामुळे कामाचे तास वाढलेत. माणसाकडून मशीन सारखे काम करण्याची अपेक्षा केली जाते... त्यामुळे आठ तासाचे 18 तास झालेले आहेत. Family time साठी weekend ची वाट पाहावी लागते... फ्रेंड सर्कल बरोबर picnic arrange केली जाते. सध्या आवड असेल तरी सवड काढता येत नाही... सवड मिळाली तरी मोबाईल ला वेळ दिला जातो. निसर्गाच्या सानिध्यात गेल्यावर निसर्ग ... डोळ्यात साठवता आला पाहिजे ... देव दर्शनाला गेल्यावर ... देवाला डोळे भरून पाहता आलं पाहिजे ... पण सेल्फी आणि फोटो काढण्याच्या नादात आपण मनाची एकाग्रता हरवून बसलो आहोत.


80 आणि 90 च्या कालावधीत किंवा त्याच्या आधी आवडीच्या गोष्टीसाठी वेळ काढला जात होता. एकत्र टीव्ही पाहणे, क्रिकेटची मॅच बघणे , सिनेमा पाहणे, पुस्तक वाचणे, magazine, दिवाळी अंक, गोष्टीची पुस्तक ,पेपर वाचणे, एकत्र फिरायला जाणे, वर्षभरातले सगळे सण ... उत्सव एकत्र साजरे करणे,  चाळीतल्या किंवा सोसायटीच्या कार्यक्रमात सहभागी होणे,  घरातला उत्सव साजरा करता करता मंडळाचा उत्सवातला... उत्साह टिकवणे, मार्केटमध्ये जाणे, मित्राच्या घरी पत्त्याचा डाव खेळणे, सुट्टीत गावाला जाणे आपल्या माणसांना भेटणे, फोटोचे अल्बम बघणे, रेडिओ वरची गाणी ऐकणे, गप्पांची देवाण-घेवाण आणि विचारांची clarity होती. टीव्हीवरील आवडीचे कार्यक्रम पाहणे, खेळणे, लोळणे, झोपणे, चालणे, ऐकणे, बघणे, बोलणे या क्रिया रोजच्या रोज होत्या.


सध्या असे आहे की ... कामातून थोडीशी फुरसत मिळाली की मोबाईल हातात घेतला जातो. पूर्वी हातात वेळ होता आणि घरातल्या माणसाची ओढ होती. आता हातात मोबाईल आल्यामुळे... ती ओढ मोबाईलला connect झाली आहे. बराच वेळ मोबाईल बघितला नाही की चुकल्यासारखे होते.  त्यामुळे माणसा ... माणसामधील संवाद हरवत चालला आहे. कामापुरते बोलले की झाले...कुटुंबाशी, मित्रांशी संवाद होताना दिसत नाही. अनेक मिनिंग लेस आणि फालतू रील्स scroll होतात. त्यात आपला बराच वेळ वाया जातो हे आपल्याला कळत सुद्धा नाही. त्यात चांगल्या रिल्स पण येत असतात. सुमन कल्याणपूरकर याचे सुंदर भावगीत, पु.ल. चा  विनोद, किशोर कुमार च्या आवाजातलं ( ए मेरे दिल सुना कोई कहानी ) गोड संगीत... पण scroll करत असताना आपल्याला थांबायचं नसतं... त्यामुळे थोडं थांबा... श्वास घ्या... प्रसन्न हसरी सकाळ... पक्षांचा किलबिलाट... मंदिरातला घंटा नाद... हिरवीगार झाडं... रंगीबेरंगी फुलं... एखादा फेरीवाला... माणसाच्या गर्दीत हरवलेला सूर्योदय आणि सूर्यास्त... अधून मधून दिसणारी लहान बाळ...  त्यांचे पाणीदार डोळे, गोड हास्य... नकळत दिसणारे आकाश... रात्रीचे चांदणे... कधी कधी दिसणारा चंद्र... एखादे रंगीत फुलपाखरू उडत असते आजूबाजूला.. पण आपले मात्र लक्ष नसते. दिवसातला  मिळणारा  मोकळा वेळ आपण फक्त मोबाईल ला देतो.  सतत scroll केल्यामुळे आपली स्मरणशक्ती आणि एकाग्रता कमी होते.  स्क्रीन टाईम चा एक विशिष्ट टाईम असणे गरजेचे आहे. कारण मोबाईल ही गरज राहिली नसून व्यसन  झाले आहे. याचा परिणाम म्हणजे आपण... आपली सुंदर आणि पुरेशी झोप सुद्धा घेत नाही... त्यामुळे busy schedule मधून उसंत मिळाली की मोबाईलला दूर ठेवा... आणि स्वतःला मोकळीक द्या.





शनिवार, ६ डिसेंबर, २०२५

चला बोलूया

या कळा नव्हे दुःखाच्या ... हितगुज तुझे सत्वाशी ...

शापिताचे भोग नव्हे हे ... पुण्याने भरली ओटी ...

चार दिसाचा खेळ ... सृजनांशी ज्याचा मेळ ...

जरी चित्त सैरभैर ... ही नवचैतन्याची वेळ ... 

घेई विसावा क्षणभर ... निसर्गाशी जुळे नाळ ...

सजे पालखी बीजाची ... होई तू भाग्यवान ...

कोणी म्हणती हा विटाळ ...  निषिद्ध हा काळ ...

सांग जगा तोऱ्यात ... सृष्टीचे हे वरदान ...

कुणी काढता वेड्यात ...  कोडे त्यास थेट घाल ...

कसा झाडाच्या फळाशी ... नाही बिजाचा विटाळ ... 

खेळ झिम्मा पोरी आता ... छेड सूर आनंदाचे ...

तुझ्या कुशीत रुजले ... गुपित हे विश्वाचे ... 

कळी फुलू दे जराशी ... मन होऊ दे हिंदोळा ...

भान जन्माचे देतो ... तो हा आनंद सोहळा ...


ही कविता माझी नाही बरं का! 2018 मध्ये 'Sony Marathi'  या channel वर ह.म. बने तु.म. बने नावाची एक सुंदर मालिका प्रदर्शित झाली होती.  त्यातल्या एका  episode मध्ये ही एक छान कविता सादर केली आहे .  खूप सुंदर सादरीकरण, भावस्पर्शी विषय मांडण्यात आला होता.  पहिल्यांदा पाळी आल्यावर ... घाबरलेल्या आपल्या मुलीला सावरण्यासाठी तिचा बाबा या कवितेतून, तिला पडलेल्या असंख्य प्रश्नांची अगदी सहजपणे उत्तरे देतो.  त्या एपिसोड चे शीर्षकही 'चला बोलूया' असेच आहे.


खरंच .. आपण या नाजुक विषयावर सहसा फार बोलत नाही...  बोलणे टाळतोच. टेलिव्हिजन सारखे माध्यम असून सुद्धा ... याबाबतीत असणारे समज - गैरसमज किंवा श्रद्धा - अंधश्रद्धा याविषयी बोलले गेलेले नाही. तो विषय ह.म. बने तु.म. बने या मालिकेत अगदी प्रभावीरीत्या  मांडण्यात आलेला आहे.  हल्ली शाळेमध्ये या गोष्टीविषयी मुलींना आधीच माहिती दिलेली असते.  पण तरीही जेव्हा अचानक पणे ...  मुलींना पहिल्यांदा periods सुरू होतात.  तेव्हा त्या भांबावून जातात, त्यांच्या मनात गोंधळ सुरू असतो. कसे react करावे हे त्यांना समजत नाही.  शारीरिक वेदना आणि मनाची घालमेल या द्विधा मनस्थितीत त्या अडकतात.  अशावेळी घरात असणारी एक आई, मोठी बहीण, आजी, मामी, काकी, मावशी यापैकी ... कोणी विश्वासू व्यक्ती सोबत संवाद साधणे गरजेचे असते. पण काही कामानिमित्त घरातली स्त्री बाहेर असेल तर एक पालक म्हणून ... आपला पुरुष वर्ग छोटीशी भूमिका नक्कीच पार पाडू शकतात.  घरात असणारे बाबा, काका, आजोबा हे सुद्धा आपल्या वयात येणाऱ्या मुलीच्या मनावरचे दडपण नक्कीच कमी करू शकतात. हा विषय फक्त बायकाच हाताळू शकतात असे काही नाही. पुरुष सुद्धा या situation मध्ये आपल्या मुलीला, आपल्या नातीला , खंबीर साथ नक्कीच देऊ शकतात. पण  अनेक ठिकाणी असे होताना दिसत नाही.  कारण मुली त्याबाबतीत थोड्या  uncomfortable असतात.  आपल्याला समजून घेणार... आपल्यासारखंच कोणीतरी समोर असावं... असं त्यांना वाटत असतं.   जर असे कोणी त्या वेळेला available नसेल ... तर तिला ... तिची स्पेस देऊन ... फक्त तिच्या अवतीभवती राहून .... तिला काय हवे नको ते पाहिले, काळजी घेतली. तर तिचा बाबा कधी तिचा मित्र होईल. हे तिला कळणार सुद्धा नाही.  बाबा, आजोबा ... तिच्या या वळणावर ... तिला भक्कम आधार देऊन,  तिचे अवघडले पण कमी करू शकतात. शरीरात आणि मनात होणारा बदल स्वीकारताना तिच्या मनाची होणारी घालमेल तुम्ही थोडी समजून घेतली. आणि तिच्याशी संवाद साधला तर तुमची फुलराणी कायम हा आनंद सोहळा स्मरणात ठेवेन.



उसंत

'मनाचा ब्रेक हा उत्तम ब्रेक' असे वाचण्यात आलेच असेल. त्यातला ब्रेक हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. जसा गाडीच्या स्पीडला अधनं मधनं ब्रेकच...