सोमवार, १९ मे, २०२५

दुसरी बाजू

प्रत्येक लग्नाची एक गोष्ट असते.  ही गोष्ट फक्त राजा.... राणीची असली तरी त्यांच्या गोष्टीला पूर्तता देणारे हे त्या दोघांचे कुटुंब असते.  ही दोन घरातील तिची आणि त्याची... प्रजा एकत्र येवून लग्न नावाचा सोहळा पार पाडतात. 

लग्ना नंतर मुलगी आपलं घर, माणसं सगळं सोडून नवर्‍याकडे येते. त्यामुळे तिला आणि तिच्या घरच्यांना जे दुःख होतं.  ते अगदी योग्यच आहे.  पण मुलाच्या आईला सुद्धा त्रास होत असतो. फक्त तो दिसत नाही. लग्ना आधी तिने अनेक वर्षे त्याला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेले असते.  मुलाच्या बालपणात ती रमून जाते...तारुण्यात त्याला समजून घेते... यश आणि अपयशामध्ये त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहते...आई आणि मुलाचे छान bonding तयार झालेले असते.  मनातले हितगुज एकमेकांशी share केलेले असते. त्यामुळे दोघांचा कोणत्याही गोष्टीवर एक विचार असतो. मुलगी सासरी येते त्यामुळे तिच्या आईला....तिचे काहीच बघावे लागत नाही.  याउलट मुलाच्या आईला सतत बघावं लागतं...आपला मुलगा...आपला राहिला नाही ते.....  तिच्या डोळ्यासमोर आपल्या मुलाला वेगळं वागलेलं...वेगळं वागवलेलं... पहावं लागतं. समोर असलेलं कधी चांगलं असतं तर कधी वाईट पण ते तिला सहन करावं लागतं.  जे दिसत असेल ते गोड मानून हसतमुखाने साजरं करावं लागतं. त्यामुळे मुलाच्या आईची बाजू छोटी नाही. 

भाऊ-बहीण किंवा भावा-भावाचं नातं हे शब्दात मांडता येणार नाही.  ते कितीही भांडले तरी... एकमेकांची काळजी, प्रेम कधीच कमी होत नाही.  एकाच्या मनात काय चाललंय हे दुसर्‍याला पक्कं ठाऊक असतं. सुख, दुःख वाटून घेण्याचा प्रश्नच येत नाही ती आपोआप by default broadcast होत असतात एकमेकांच्या मनात....असं भरभरून व्यक्त होणारं प्रेम...लग्ना नंतर मात्र या नात्यात एक अव्यक्त दुरावा निर्माण होतो.  अनेक वर्षाची मैत्री, जिव्हाळा असून सुद्धा या नात्यात एक अदृश्य भिंत तयार होते.  

लग्नानंतर मुलीचं संपूर्ण जग बदलून जातं. तसचं मुलाच्या आयुष्याला ही वेगळी कलाटणी मिळालेली असते.  एकत्र कुटुंब असेल तर..घरातल्या सगळ्यांना....नव्या सूनबाईला सामावून घेण्यासाठी धडपड चालू असते.  माझं घर...माझा संसार असावा.  असं प्रत्येक मुलीला वाटतं. त्यात काही चुकीचं नाही.  एकत्र कुटुंब असेल तर असं वाटणं साहजिकच आहे. पण अशावेळी स्वतः ची सद्सद्विवेक बुद्धी वापरून... कोणाशीही तुलना न करता....स्वतः च्या आयुष्याकडे बघता यायला हवं. ही गणितं वेळच्या वेळी सोडवता आली पाहिजे.  नाहीतर सगळ्यांना त्रास सहन करावा लागतो.  

प्रत्येक कुटुंबाचा एक सुंदर प्रवास असतो.  नात्याची एक घट्ट वीण तयार झालेली असते.  नवीन येणार्‍या मुलीने हा विचार करायला हवा.  जसे माझ्या माहेरी मला सगळे हवे आहेत.  तसेच माझ्या नवर्‍याला सुद्धा त्याच्या...घरातलं प्रत्येक नातं हवं आहे.  सासरचे लोक हे आपलं वाईट चितंणारे आणि त्रास देणारे असतात असा फिल्मी समज मुली करून घेतात.  हक्काची जाणीव असते पण कर्तव्याची  नसते. माहेरचा support हवा असतो.... मात्र आपल्या सासरी...त्या अलिप्तपणे वागत राहतात. 

व्यक्त होणारं नातं जेव्हा कालांतराने अव्यक्त होत जातं. तेव्हा स्वतः च ... स्वतः ला तपासून बघावं....की माझ्यासाठी नातं महत्त्वाचं की राग...रागाची लाट माणसाला आंधळं करून टाकते.  गैरसमज, राग, पूर्वग्रह, हट्ट  याने आपलं जग उध्वस्त होवू शकतं. सतत अटीतटीने जगणं बरोबर नाही.  Relax होवून जगावं.  आपले हट्ट सोडण्यातही  आनंद असतो....तो मानावा. आटापिटा, भांडण, वाद याशिवाय ही सहजपणे जगता येतं.  वाद असावेत पण सुसंवादाने  ते बोलता यावेत.  आपले गुण दुसर्‍याने अनुभवावे आणि आपले दोष आपणच पहावे. 

सगळीच नाती गोड असतात.  प्रत्येक नात्याचं एक वैशिष्ट्य असतं. आई-वडिलांचा आधार, प्रेम आणि भावंडाची शब्दांत न सांगता येणारी माया ! .... मुलगी असो....की मुलगा....लग्नानंतर त्यात तेढ येता कामा नये.  प्रत्येक नातं वेगळं असतं...आणि त्यात मिळणारा आनंद हा वेगळा असतो.  कोणतीही गोष्ट तुमच्या control ने होणार नाही.  
आपल्या आजूबाजूला वाहणारा वारा जसा त्याच्या सोयी प्रमाणे इकडे .. तिकडे वाहतो. त्याप्रमाणे आपल्याला...
आपली दिशा बदलावी लागते.  तसेच समोर असणाऱ्या माणसांना आपण control करू शकत नाही.  आपण फक्त स्वतः ला control करू शकतो.  निसर्गाचे किती... छान discipline आहे. मग आपण याबाबतीत मागे का असतो.  
नाण्याच्या दोन बाजू असतात हे आपल्याला माहीत आहे.  नात्याला ही दोन बाजू असतात. पण ही दुसरी बाजू...कोणाला...कधी...पहायची नसते. आपली बाजू ठाम करताना...दुसरी बाजू...आपलीशी केली... तर एक सुंदर प्रेमाचं वलय नक्की तयार होईल. 



















शुक्रवार, २ मे, २०२५

Zen

 Zen म्हणजे काय? असा प्रश्‍न सगळ्यांना पडला असेल.  Zen तत्त्वज्ञान ही बुद्ध धर्मातील एक सुंदर विचारसरणी आहे.  ही विचारसरणी प्रत्यक्ष अनुभव आणि ध्यान....यावर भर देते. Zen चा अर्थ ध्यान असा होतो.  Zen ही एक बौद्ध परंपरा आहे.  या परंपरेत आत्मपरीक्षण आणि ध्यान धारणेतून आपल्याला...आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यात सुधारणा करता येते. 

Zen तत्त्वज्ञान तुम्हाला अगदी छोट्या गोष्टीतून....एक नवा दृष्टिकोन सहज देवून जाते.  तुम्ही जेव्हा नदीत आपलं पहिलं पाऊल टाकता.  त्यानंतर तुमचं दुसरं पाऊल त्याच ठिकाणी ठेवू शकत नाही. नदीचे पाणी हे वाहतं असतं.  त्यामुळे नदीच्या पाण्यात आपण....आपलं पहिलं पाऊल टाकतो. तेव्हा ते पाणी आपल्या पायाला बिलगून पुढे निघून जातं.  पुन्हा कधीच त्या पाण्यात आपण....आपले पाऊल टाकू शकत नाही.  आपल्या आयुष्यात येणारा प्रत्येक क्षण हा असाच आपल्याला स्पर्श करून पुढे निघून जातो.  तो पुन्हा मागे आणता येत नाही. आपल्याला पुढे जावं लागतं. साचून राहिलेलं पाणी हे गढूळ होत जातं. मात्र वाहतं पाणी हे स्वच्छ आणि पारदर्शी राहतं. 

निसर्ग हा आपल्याला सतत.... कसे जगायचे....हे शिकवत असतो.  कधी आपण पाऊल असतो तर कधी आपण पाणी असतो.  कधी स्थिर असतो.  तर कधी अस्थिर....पण तरीही आपण....प्रत्येक क्षणात...नवे असतो. 

Zen म्हणजे काय? तर काहीही धरून ठेवू नका.  सोडून द्या.  श्वासांचा आस्वाद घ्या.  कृतज्ञतेने श्वास घ्या आणि प्रेमाने श्वास सोडून द्या. आपल्या आयुष्यातील अनेक समस्या ध्यान धारणेतून आपण कमी करू शकतो.  खरा आनंद फक्त संपत्ती आणि प्रसिद्धी नाही.  तर तो आपल्या आत आहे.  बौध्द धर्म आपल्याला हेच सांगतो.  तुम्ही इतरांना जितके द्याल.  तितके तुम्हाला मिळेल.  दैनंदिन जीवनात zen मनाला आतून शांत करते.  त्यामुळे आपले मानसिक आरोग्य तर सुधारते पण हल्ली कमी वयात होणारे BP, Stress, Hyper tension, Imunity, Sleeping problem अगदी सहज सुधारतात.  तेव्हा स्वतः साठी आपला zen प्रवास सुरू करा. 




उसंत

'मनाचा ब्रेक हा उत्तम ब्रेक' असे वाचण्यात आलेच असेल. त्यातला ब्रेक हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. जसा गाडीच्या स्पीडला अधनं मधनं ब्रेकच...