गुरुवार, १ फेब्रुवारी, २०२४

कुटुंबवत्सल

भिंती खिडक्या दारे नच घर 
छप्पर सुंदर तेही नच घर 
माणुसकीचे लावी अत्तर!
ते माझे घर! ते माझे घर!

श्रीराम आठवले यांची ही कविता खरचं चिंतन करण्यासारखी आहे. 
प्रत्येकाला हवे असणारे घर हे फक्त चार भिंतीनी नाही तर त्यात राहणार्‍या माणसांनी बनते. सुरक्षिततेची हमी देणारे भर भक्कम छप्पर आणि त्या आधारावर उभ्या असणार्‍या दिलासा, उमेद, जिव्हाळा, प्रेम या चार भिंती....त्यांना असणारी मायेची खिडकी आणि सुखाचे दरवाजे म्हणजे घर ! 🏠
अशा घरात एकत्र नांदणारे सगळे जण हे आपलं ' कुटुंब '
पोटा पाण्यासाठी धावणारे माणसाचे पाय...दिवसभराची दगदग संपली की जिथे घराच्या ओढीने परततात आणि सुखाने स्थिरावतात. ते आपलं घर! जगाच्या कोपर्‍यात कुठेही गेलात आणि आलिशान अशा हॉटेल मध्ये राहिलात तरी घरासारखा आसरा फक्त आपल्या माणसांमधे मिळतो. 

एक कुटुंब आणि अशा अनेक कुटुंब संस्था आपल्या समाज रचनेला मजबूत बनवतात. पूर्वी असणार्‍या एकत्र कुटुंबात तीन पिढ्या गुण्यागोविंदाने.... एकाच घरात रहात असत. त्यामुळे एका पिढीकडून.... दुसर्‍या पिढीकडे...संस्कार आणि आचार विचारांची...देवाणघेवाण आपोआप होत असे. आता अनेक ठिकाणी दिसणारी विभक्त कुटुंब पद्धती....ही घरातल्या माणसाच्या सोयीने तयार झाली आहेत  आणि तसेही... बदल ही काळाची गरज आहे. या बदलत्या जीवनशैली चा परिणाम आपल्या कुटुंब संस्थेवर होताना दिसतो. घटस्फोटाचे आणि एकटे राहणाऱ्यांचे प्रमाण वाढते आहे. Live in relationship, double income...no kid या मतावर ठाम असणारी couples तशी कमी आहे. तरी पण...तो एक नवा trend आहे. त्यामुळेच की काय....आजच्या पिढीला लग्न, मुलं, कुटुंब, नाती यांचे पाश आणि जबाबदारी नको वाटते. 

कुटुंब लहान असो की मोठे .... आपल्याला हसावं वाटलं...तर हसण्याची....रडावं वाटलं तर रडण्याची.... आणि चिडावं वाटलं...तर चिडायची....एकमेव हक्काची...व्यक्त होण्याची... ती एक जागा म्हणजे... आपलं 'कुटुंब 'असते. कुटुंब हा तसा जिव्हाळ्याचा विषय आहे.  आणि जिव्हाळा असला की ते मनाला कुठेतरी भावतं....अशी भावणारी माणसं ही 'कुटुंबवत्सल ' असतात. वात्सल्य हे फक्त स्त्री पुरतं मर्यादीत नसतं. तर कुटुंबा विषयी वत्सलता बाळगणारे पुरुष ही असतात.  आजोबा आणि वडिलांनी आपल्या मुला नातवांना दिलेला दम....हा द्यायलाच हवा.  घरातलं वातावरण आनंदी राहण्यासाठी...अधनं मधनं असा डोस पाहिजे. आपले घर आणि घरातल्या माणसा विषयी ओढ असणारी....अशी ही कुटुंबवत्सल माणसे असतात. अशी भावबंध जपणारी माणसे सोबतीला असतील तर सुखाचे अनेक सोहळे ... उत्साहाने साजरे होतात आणि दुःख ही तितक्याच आवेगाने वाटून घेतले जाते. डोळ्यात गेलेला छोटासा कण काढायला जसा दुसरा कोणीतरी माणूस लागतो. तसेच आयुष्यात आलेले अनेक सुख दुःखाचे क्षण झेलायला माणसे लागतात. स्वतः ची चूक कबूल करण्यासाठी असणारा मनाचा मोठेपणा आणि  समोरच्याची चूक उदारपणे माफ करण्यासाठी असणारे मनाचे औदार्य...या दोन्ही गोष्टी तो आणि ती...कुटुंबवत्सल माणसामध्ये आहेत म्हणून आजवर अनेक घराचे घरपण टिकून आहे. 
तसेही कुणीतरी म्हणून ठेवलंय...
घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती 
इथे असावा प्रेम जिव्हाळा, नकोत नुसती नाती 🏠


 






उसंत

'मनाचा ब्रेक हा उत्तम ब्रेक' असे वाचण्यात आलेच असेल. त्यातला ब्रेक हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. जसा गाडीच्या स्पीडला अधनं मधनं ब्रेकच...