बाळाचे बोबडे बोल सुरू झाले की व्यक्त होण्याची सुरुवात होते. आपल्याला काय हवे आणि काय नको हे बाळाच्या फक्त अर्धवट बोलण्यातून किंवा न बोलण्यातून सुद्धा आईला कळते. ही व्यक्त अव्यक्त ची गोड भाषा आईच्या पोटातच बाळ शिकून घेते.
आमच्या वेळी आम्ही व्यक्त होण्यासाठी फक्त बोलत नव्हतो. तर लिहित सुद्धा होतो. एक म्हणजे शुद्धलेखन... यात भाषा शुद्धी बरोबर ती आखीवरेखीव आणि सुंदर कशी दिसेल यावर शाळेत भर दिला जात होता. दुसरा आमचा सोबती निबंध... यात आम्ही आमच्या मनाचे सुंदर मनोरे बांधत होतो. क्षणात आम्ही मुख्यमंत्री होत असू आणि क्षणात करोडपती... त्यावेळेस ना google होते ना Internet...पण आमच्या छोट्याश्या डोक्याला पुस्तकांचे खाद्य भरपूर होते. आपल्या शब्दात...आपल्या वाक्यांची सांगड घालत निबंध तयार होत असत. Search करायची गरजच नव्हती. मनातल्या Network ला भरपूर range असायची. कधी ते उंच डोंगरावर जायचं तर कधी समुद्राच्या खोल तळाशी...
तिसरी आमची प्रिय सखी पत्रलेखन...एकमेकांची खुशाली कळण्यासाठी हे एकच माध्यम होते. पत्राच्या मायना वरून समजायचे की...हे पत्र घरातल्या वयाने मोठ्या असणार्या सदस्या साठी आहे. पत्र वाचताना कळायचे की पत्र लिहिणारा माणसाचा mood कसा आहे. इतके मना पासून शब्द पत्रात उतरवलेले असायचे. कधी आनंदाश्रू...तर कधी आठवणीचा उमाळा वाहायचा. पत्र असे एकमेव माध्यम होते ज्याने दूर असणारी नाती जोडलेली होती. लहानांपासून ते थोरांपर्यंत सगळ्यांची खुशाली कळायची. त्या पत्रा मधून सातासमुद्रापार असलेले आपल्यांचे....भरभरून आशिर्वाद आणि व्यक्त अव्यक्त प्रेम मिळायचे.
सध्या whatupp आणि mobile मुळे आपण एकमेकांशी सतत connect आहोत. रोज बोलतो , रोज chatting करतो. पण तरीही सहज पणे एकमेकांची मने दुखावतो. पटत असो वा नसो. हवं तसं बोललं की झालं. बेफिकीर अशा या संस्कृतीमध्ये... ना कोणी तीर्थरूप उरले आहेत... ना कोणी प्रिय!
आमच्या कडे विचारांची खूप श्रीमंती होती. त्यामुळे बोलताना त्यात गोडवा असायचा. जपून बोलणे, तोलून मापून शब्द वापरणे आणि कुठे fullstop ठेवायचा हे माहीत असायचे. त्यामुळे गोष्टी व्यवस्थित हाताळल्या जात होत्या. आता वाद घालणे खूप सोपे झाले आहे आणि सुसंवाद फारच कमी झालेला आहे.
व्यक्त होणे म्हणजे फक्त भडाभडा बोलणे नाही तर विचार पूर्वक बोलणे. आनंद, प्रेम, दुःख, भावना, मत हे व्यक्त करायचे असेल तर मनात असलेल्या भावना शब्दात मांडाव्या लागतात. या भावना अव्यक्त नसाव्यात कारण त्याने आपलीच हानी होते. नात्याचंही तेच आहे. व्यक्त होण्याने प्रेम टिकते, मनातले गैरसमज दूर होतात आणि सामंजस्याने व्यक्त झाले की प्रश्न सुटतात. माणसाने निसर्गाकडून व्यक्त व्हायला शिकलं पाहिजे. निसर्ग हातचं काही राखून न ठेवता किती भरभरून बोलतो. व्यक्त होतो तो निसर्ग आणि अव्यक्त राहतात ती माणसे!