नभ टिपूस टिपूस,
रानीवनी पानोपानी,
मन पाऊस पाऊस 🌧
मन, पाऊस, आठवणी, सोबत चहा, भजी, भुट्टा यांचा मेळ फक्त पावसाच्या ऋतूत जुळून येतो. पाऊस हा माणसाच्या मना सारखा आभाळ भर दाटून येतो आणि इतका कोसळतो की ही सगळी अवनी स्वच्छ, नितळ होवून जाते. अशा या सुंदर ऋतू वर अनेक कविता, शेरोशायरी, गाणी रचलेली आहेत.
श्रावणमासी हर्षमानसी, हिरवळ दाटे चोहीकडे,
क्षणात येते सरसर शीरवे, क्षणात फिरूनी ऊन पडे
आषाढ नंतर येणारा श्रावण हा थोडा पाऊस आणि थोडे ऊन यांचा लपंडाव घेवून येतो. श्रावणा तले पिवळे ऊन निसर्गा च्या कलाकुसरीत आणखीन भर घालते. पावसाची परी आपल्या घरी छान सणाची ओंजळ भरून आणते. आणि घरा घरात मांगल्याचा सुवास दरवळू लागतो.
असा हा ऋतू हिरवा...ऋतू बरवा तव्या समान तापलेल्या धरणीला पावसाच्या धारा नी ओलेचिंब करून टाकतो. उन्हाळ्याच्या तडाख्या मुळे सगळे वातावरण गरम झालेले असते. अशा गरमी मुळे प्राणी, पक्षी, झाडे सुकून गेलेली असतात. सगळेजण आकाशाकडे नजर लावून असतात. जेव्हा पहिला पाऊस पडतो. तेव्हा घरादाराची, वृक्ष वेलीची जणू आंघोळच होवून जाते. नवीन हिरवा शालू नेसून आपली अवनी सजून...नटून तयार होते.
चिंब पावसाने रान झालं आबादानी... असा निसर्ग ओलेचिंब होतो आणि मातीतून सुगंध दरवळू लागतो. पाऊस पडताच सर्व झाडे, वेली, पाने, फुले टवटवीत होतात. पशु - पक्षी आनंदित होवून जातात.
श्रावणात घन निळा बरसला, रिमझिम रेशीम धारा,
उलगडला झाडातून, अवचित हिरवा मोरपिसारा
मन हे पावसा सारखे असू द्यावे. कधी कधी त्याला ही मोकळे होवू द्यावे. मनातल्या गोष्टी मनात ठेवल्याने त्या साचत राहतात. साचत राहिल्याने मनाचे डबके कधी तयार होते. हे आपल्याला कळत सुद्धा नाही. म्हणून जे काही मनात आहे ते जेव्हा अनावर होते तेव्हा त्याला थोडी वाट करून द्यावी. म्हणजे निर्मळ पाण्याच्या झर्या प्रमाणे ते सगळे वाहून जाते.
आसवांपरी ढग बरसूनी यावे,
मनाच्या काळोखात जणू चांदणेच फुलावे,
भिरभिरणाऱ्या वा-यासवे गीत नवे प्रीतीचे गावे,
आसवांपरी ढग सारे ओसंडून यावे
मनाच्या काळोखात जणू चांदणेच फुलावे,
भिरभिरणाऱ्या वा-यासवे गीत नवे प्रीतीचे गावे,
आसवांपरी ढग सारे ओसंडून यावे
लहान मुलांचा पाऊस हा सगळ्यात आवडता ऋतू...ए आई .. मला पावसात जाऊ दे ना...एकदाच ग...भिजूनी मला चिंब चिंब होवू दे ना... हल्ली मुलांना पावसात भिजण्यासाठी, खेळण्यासाठी आईची परवानगी घ्यावी लागते. Water park मध्ये साचलेल्या पाण्यात खेळण्या पेक्षा हे Water park कधी ही चांगलेच की...
अग्गोबाई ढग्गोबाई लागली कळ,
ढगाला उन्हाची केवढी झळ,
थोडी ना थोडकी लागली फार,
डोंगराच्या डोळ्याला पाण्याची धार
मित्र...मैत्रिणी साठी पाऊस म्हणजे trecking, picnic, गाणी, मस्ती नुसती मजाच असते. भरपूर गप्पा...टप्पा करत गाणी गात असे झुंड पावसाळ्यात picnic spot वर जागोजागी दिसतील. दुनियादारी पासून अजून थोडे लांब असलेले मैत्रीचे जग भरभरून उत्साहात पावसाची मजा घेत असतात. निसर्गाच खुललेलं सौंदर्य बघायला भटकंती करण्यात एक वेगळीच मजा असते.
पुन्हा पावसाला सांगायचे...कुणाला किती थेंब वाटायचे
Couples साठी पाऊस म्हणजे एका छत्रीतून थोडेसे भिजणं आणि मनसोक्त फिरणं...
गारवा...वाऱ्यावर भिरभिर पारवा नवा नवा ,
प्रिये...नभात ही चांदवा नवा नवा
पावसाचं आणि आठवणीच एक वेगळचं नातं आहे. कुणाला पहिलं प्रेम आठवतं आणि कुणी बालपणीच्या आठवणीत रमून जातं. वयाच्या प्रत्येक टप्प्यावर पावसाच्या वेगवेगळया आठवणी आपसूकच कोरल्या जातात.
असे चित्र पावसाचे,
जणू इवला कोलाज
सार्या आठवणी खुळ्या
त्यांत मावल्या सहज..!
मन पाऊस पाऊस
म्हणे कसा बरसला?
अगं मनातच होता
तुला आज गवसला..!