बुधवार, ३१ डिसेंबर, २०२५

उसंत

'मनाचा ब्रेक हा उत्तम ब्रेक' असे वाचण्यात आलेच असेल. त्यातला ब्रेक हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. जसा गाडीच्या स्पीडला अधनं मधनं ब्रेकची गरज असते. तसेच माणसाच्या रुटीनला सुद्धा ब्रेकची गरज असते... हा रुटीन मधला ब्रेक... तसे सगळेच घेताना दिसतात पण रोजची किंवा दोन चार दिवसांनी मिळणारी उसंत मात्र घेताना दिसत नाही. कारण एकच आहे माणूस धावत सुटला आहे. पूर्वी नोकरी 9 ते 5 या वेळेत असायची त्यामुळे कुटुंबाचा सहवास मिळायचा...न चुकता रोजचा संवाद, एकमेकांसोबत वेळ घालवणे होते.  थोडा फेरफटका ,मित्रांशी, शेजाऱ्यांशी संवाद होता. चालणं होत होतं... त्यामुळे माणसं भेटायची. बस आणि ट्रेनमुळे ग्रुप जमले होते.  त्यांचे पत्त्यांचे डाव, गप्पाटप्पा, अंताक्षरी यासारखे अनेक कार्यक्रम व्हायचे. माणूस माणसात होता.. त्यामुळे तो खिदळायचा, हसायचा, खेळायचा, भडाभडा बोलायचा... आत्ता जगायची समीकरणे थोडी बदलली आहेत. माणूस कार मध्ये असो ट्रेनमध्ये असो किंवा बस मध्ये  मोबाईल हातात आल्यामुळे माणसं बोलायला विसरली आहेत... डोळे हे मोबाईलवर असल्यामुळे समोरचं बघणं विसरली आहेत... आणि कानात हेडफोन असल्यामुळे ऐकायला विसरली आहेत. 


आजकाल job मध्ये target असतात. त्यामुळे कामाचे तास वाढलेत. माणसाकडून मशीन सारखे काम करण्याची अपेक्षा केली जाते... त्यामुळे आठ तासाचे 18 तास झालेले आहेत. Family time साठी weekend ची वाट पाहावी लागते... फ्रेंड सर्कल बरोबर picnic arrange केली जाते. सध्या आवड असेल तरी सवड काढता येत नाही... सवड मिळाली तरी मोबाईल ला वेळ दिला जातो. निसर्गाच्या सानिध्यात गेल्यावर निसर्ग ... डोळ्यात साठवता आला पाहिजे ... देव दर्शनाला गेल्यावर ... देवाला डोळे भरून पाहता आलं पाहिजे ... पण सेल्फी आणि फोटो काढण्याच्या नादात आपण मनाची एकाग्रता हरवून बसलो आहोत.


80 आणि 90 च्या कालावधीत किंवा त्याच्या आधी आवडीच्या गोष्टीसाठी वेळ काढला जात होता. एकत्र टीव्ही पाहणे, क्रिकेटची मॅच बघणे , सिनेमा पाहणे, पुस्तक वाचणे, magazine, दिवाळी अंक, गोष्टीची पुस्तक ,पेपर वाचणे, एकत्र फिरायला जाणे, वर्षभरातले सगळे सण ... उत्सव एकत्र साजरे करणे,  चाळीतल्या किंवा सोसायटीच्या कार्यक्रमात सहभागी होणे,  घरातला उत्सव साजरा करता करता मंडळाचा उत्सवातला... उत्साह टिकवणे, मार्केटमध्ये जाणे, मित्राच्या घरी पत्त्याचा डाव खेळणे, सुट्टीत गावाला जाणे आपल्या माणसांना भेटणे, फोटोचे अल्बम बघणे, रेडिओ वरची गाणी ऐकणे, गप्पांची देवाण-घेवाण आणि विचारांची clarity होती. टीव्हीवरील आवडीचे कार्यक्रम पाहणे, खेळणे, लोळणे, झोपणे, चालणे, ऐकणे, बघणे, बोलणे या क्रिया रोजच्या रोज होत्या.


सध्या असे आहे की ... कामातून थोडीशी फुरसत मिळाली की मोबाईल हातात घेतला जातो. पूर्वी हातात वेळ होता आणि घरातल्या माणसाची ओढ होती. आता हातात मोबाईल आल्यामुळे... ती ओढ मोबाईलला connect झाली आहे. बराच वेळ मोबाईल बघितला नाही की चुकल्यासारखे होते.  त्यामुळे माणसा ... माणसामधील संवाद हरवत चालला आहे. कामापुरते बोलले की झाले...कुटुंबाशी, मित्रांशी संवाद होताना दिसत नाही. अनेक मिनिंग लेस आणि फालतू रील्स scroll होतात. त्यात आपला बराच वेळ वाया जातो हे आपल्याला कळत सुद्धा नाही. त्यात चांगल्या रिल्स पण येत असतात. सुमन कल्याणपूरकर याचे सुंदर भावगीत, पु.ल. चा  विनोद, किशोर कुमार च्या आवाजातलं ( ए मेरे दिल सुना कोई कहानी ) गोड संगीत... पण scroll करत असताना आपल्याला थांबायचं नसतं... त्यामुळे थोडं थांबा... श्वास घ्या... प्रसन्न हसरी सकाळ... पक्षांचा किलबिलाट... मंदिरातला घंटा नाद... हिरवीगार झाडं... रंगीबेरंगी फुलं... एखादा फेरीवाला... माणसाच्या गर्दीत हरवलेला सूर्योदय आणि सूर्यास्त... अधून मधून दिसणारी लहान बाळ...  त्यांचे पाणीदार डोळे, गोड हास्य... नकळत दिसणारे आकाश... रात्रीचे चांदणे... कधी कधी दिसणारा चंद्र... एखादे रंगीत फुलपाखरू उडत असते आजूबाजूला.. पण आपले मात्र लक्ष नसते. दिवसातला  मिळणारा  मोकळा वेळ आपण फक्त मोबाईल ला देतो.  सतत scroll केल्यामुळे आपली स्मरणशक्ती आणि एकाग्रता कमी होते.  स्क्रीन टाईम चा एक विशिष्ट टाईम असणे गरजेचे आहे. कारण मोबाईल ही गरज राहिली नसून व्यसन  झाले आहे. याचा परिणाम म्हणजे आपण... आपली सुंदर आणि पुरेशी झोप सुद्धा घेत नाही... त्यामुळे busy schedule मधून उसंत मिळाली की मोबाईलला दूर ठेवा... आणि स्वतःला मोकळीक द्या.





शनिवार, ६ डिसेंबर, २०२५

चला बोलूया

या कळा नव्हे दुःखाच्या ... हितगुज तुझे सत्वाशी ...

शापिताचे भोग नव्हे हे ... पुण्याने भरली ओटी ...

चार दिसाचा खेळ ... सृजनांशी ज्याचा मेळ ...

जरी चित्त सैरभैर ... ही नवचैतन्याची वेळ ... 

घेई विसावा क्षणभर ... निसर्गाशी जुळे नाळ ...

सजे पालखी बीजाची ... होई तू भाग्यवान ...

कोणी म्हणती हा विटाळ ...  निषिद्ध हा काळ ...

सांग जगा तोऱ्यात ... सृष्टीचे हे वरदान ...

कुणी काढता वेड्यात ...  कोडे त्यास थेट घाल ...

कसा झाडाच्या फळाशी ... नाही बिजाचा विटाळ ... 

खेळ झिम्मा पोरी आता ... छेड सूर आनंदाचे ...

तुझ्या कुशीत रुजले ... गुपित हे विश्वाचे ... 

कळी फुलू दे जराशी ... मन होऊ दे हिंदोळा ...

भान जन्माचे देतो ... तो हा आनंद सोहळा ...


ही कविता माझी नाही बरं का! 2018 मध्ये 'Sony Marathi'  या channel वर ह.म. बने तु.म. बने नावाची एक सुंदर मालिका प्रदर्शित झाली होती.  त्यातल्या एका  episode मध्ये ही एक छान कविता सादर केली आहे .  खूप सुंदर सादरीकरण, भावस्पर्शी विषय मांडण्यात आला होता.  पहिल्यांदा पाळी आल्यावर ... घाबरलेल्या आपल्या मुलीला सावरण्यासाठी तिचा बाबा या कवितेतून, तिला पडलेल्या असंख्य प्रश्नांची अगदी सहजपणे उत्तरे देतो.  त्या एपिसोड चे शीर्षकही 'चला बोलूया' असेच आहे.


खरंच .. आपण या नाजुक विषयावर सहसा फार बोलत नाही...  बोलणे टाळतोच. टेलिव्हिजन सारखे माध्यम असून सुद्धा ... याबाबतीत असणारे समज - गैरसमज किंवा श्रद्धा - अंधश्रद्धा याविषयी बोलले गेलेले नाही. तो विषय ह.म. बने तु.म. बने या मालिकेत अगदी प्रभावीरीत्या  मांडण्यात आलेला आहे.  हल्ली शाळेमध्ये या गोष्टीविषयी मुलींना आधीच माहिती दिलेली असते.  पण तरीही जेव्हा अचानक पणे ...  मुलींना पहिल्यांदा periods सुरू होतात.  तेव्हा त्या भांबावून जातात, त्यांच्या मनात गोंधळ सुरू असतो. कसे react करावे हे त्यांना समजत नाही.  शारीरिक वेदना आणि मनाची घालमेल या द्विधा मनस्थितीत त्या अडकतात.  अशावेळी घरात असणारी एक आई, मोठी बहीण, आजी, मामी, काकी, मावशी यापैकी ... कोणी विश्वासू व्यक्ती सोबत संवाद साधणे गरजेचे असते. पण काही कामानिमित्त घरातली स्त्री बाहेर असेल तर एक पालक म्हणून ... आपला पुरुष वर्ग छोटीशी भूमिका नक्कीच पार पाडू शकतात.  घरात असणारे बाबा, काका, आजोबा हे सुद्धा आपल्या वयात येणाऱ्या मुलीच्या मनावरचे दडपण नक्कीच कमी करू शकतात. हा विषय फक्त बायकाच हाताळू शकतात असे काही नाही. पुरुष सुद्धा या situation मध्ये आपल्या मुलीला, आपल्या नातीला , खंबीर साथ नक्कीच देऊ शकतात. पण  अनेक ठिकाणी असे होताना दिसत नाही.  कारण मुली त्याबाबतीत थोड्या  uncomfortable असतात.  आपल्याला समजून घेणार... आपल्यासारखंच कोणीतरी समोर असावं... असं त्यांना वाटत असतं.   जर असे कोणी त्या वेळेला available नसेल ... तर तिला ... तिची स्पेस देऊन ... फक्त तिच्या अवतीभवती राहून .... तिला काय हवे नको ते पाहिले, काळजी घेतली. तर तिचा बाबा कधी तिचा मित्र होईल. हे तिला कळणार सुद्धा नाही.  बाबा, आजोबा ... तिच्या या वळणावर ... तिला भक्कम आधार देऊन,  तिचे अवघडले पण कमी करू शकतात. शरीरात आणि मनात होणारा बदल स्वीकारताना तिच्या मनाची होणारी घालमेल तुम्ही थोडी समजून घेतली. आणि तिच्याशी संवाद साधला तर तुमची फुलराणी कायम हा आनंद सोहळा स्मरणात ठेवेन.



सोमवार, १९ मे, २०२५

दुसरी बाजू

प्रत्येक लग्नाची एक गोष्ट असते.  ही गोष्ट फक्त राजा.... राणीची असली तरी त्यांच्या गोष्टीला पूर्तता देणारे हे त्या दोघांचे कुटुंब असते.  ही दोन घरातील तिची आणि त्याची... प्रजा एकत्र येवून लग्न नावाचा सोहळा पार पाडतात. 

लग्ना नंतर मुलगी आपलं घर, माणसं सगळं सोडून नवर्‍याकडे येते. त्यामुळे तिला आणि तिच्या घरच्यांना जे दुःख होतं.  ते अगदी योग्यच आहे.  पण मुलाच्या आईला सुद्धा त्रास होत असतो. फक्त तो दिसत नाही. लग्ना आधी तिने अनेक वर्षे त्याला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेले असते.  मुलाच्या बालपणात ती रमून जाते...तारुण्यात त्याला समजून घेते... यश आणि अपयशामध्ये त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहते...आई आणि मुलाचे छान bonding तयार झालेले असते.  मनातले हितगुज एकमेकांशी share केलेले असते. त्यामुळे दोघांचा कोणत्याही गोष्टीवर एक विचार असतो. मुलगी सासरी येते त्यामुळे तिच्या आईला....तिचे काहीच बघावे लागत नाही.  याउलट मुलाच्या आईला सतत बघावं लागतं...आपला मुलगा...आपला राहिला नाही ते.....  तिच्या डोळ्यासमोर आपल्या मुलाला वेगळं वागलेलं...वेगळं वागवलेलं... पहावं लागतं. समोर असलेलं कधी चांगलं असतं तर कधी वाईट पण ते तिला सहन करावं लागतं.  जे दिसत असेल ते गोड मानून हसतमुखाने साजरं करावं लागतं. त्यामुळे मुलाच्या आईची बाजू छोटी नाही. 

भाऊ-बहीण किंवा भावा-भावाचं नातं हे शब्दात मांडता येणार नाही.  ते कितीही भांडले तरी... एकमेकांची काळजी, प्रेम कधीच कमी होत नाही.  एकाच्या मनात काय चाललंय हे दुसर्‍याला पक्कं ठाऊक असतं. सुख, दुःख वाटून घेण्याचा प्रश्नच येत नाही ती आपोआप by default broadcast होत असतात एकमेकांच्या मनात....असं भरभरून व्यक्त होणारं प्रेम...लग्ना नंतर मात्र या नात्यात एक अव्यक्त दुरावा निर्माण होतो.  अनेक वर्षाची मैत्री, जिव्हाळा असून सुद्धा या नात्यात एक अदृश्य भिंत तयार होते.  

लग्नानंतर मुलीचं संपूर्ण जग बदलून जातं. तसचं मुलाच्या आयुष्याला ही वेगळी कलाटणी मिळालेली असते.  एकत्र कुटुंब असेल तर..घरातल्या सगळ्यांना....नव्या सूनबाईला सामावून घेण्यासाठी धडपड चालू असते.  माझं घर...माझा संसार असावा.  असं प्रत्येक मुलीला वाटतं. त्यात काही चुकीचं नाही.  एकत्र कुटुंब असेल तर असं वाटणं साहजिकच आहे. पण अशावेळी स्वतः ची सद्सद्विवेक बुद्धी वापरून... कोणाशीही तुलना न करता....स्वतः च्या आयुष्याकडे बघता यायला हवं. ही गणितं वेळच्या वेळी सोडवता आली पाहिजे.  नाहीतर सगळ्यांना त्रास सहन करावा लागतो.  

प्रत्येक कुटुंबाचा एक सुंदर प्रवास असतो.  नात्याची एक घट्ट वीण तयार झालेली असते.  नवीन येणार्‍या मुलीने हा विचार करायला हवा.  जसे माझ्या माहेरी मला सगळे हवे आहेत.  तसेच माझ्या नवर्‍याला सुद्धा त्याच्या...घरातलं प्रत्येक नातं हवं आहे.  सासरचे लोक हे आपलं वाईट चितंणारे आणि त्रास देणारे असतात असा फिल्मी समज मुली करून घेतात.  हक्काची जाणीव असते पण कर्तव्याची  नसते. माहेरचा support हवा असतो.... मात्र आपल्या सासरी...त्या अलिप्तपणे वागत राहतात. 

व्यक्त होणारं नातं जेव्हा कालांतराने अव्यक्त होत जातं. तेव्हा स्वतः च ... स्वतः ला तपासून बघावं....की माझ्यासाठी नातं महत्त्वाचं की राग...रागाची लाट माणसाला आंधळं करून टाकते.  गैरसमज, राग, पूर्वग्रह, हट्ट  याने आपलं जग उध्वस्त होवू शकतं. सतत अटीतटीने जगणं बरोबर नाही.  Relax होवून जगावं.  आपले हट्ट सोडण्यातही  आनंद असतो....तो मानावा. आटापिटा, भांडण, वाद याशिवाय ही सहजपणे जगता येतं.  वाद असावेत पण सुसंवादाने  ते बोलता यावेत.  आपले गुण दुसर्‍याने अनुभवावे आणि आपले दोष आपणच पहावे. 

सगळीच नाती गोड असतात.  प्रत्येक नात्याचं एक वैशिष्ट्य असतं. आई-वडिलांचा आधार, प्रेम आणि भावंडाची शब्दांत न सांगता येणारी माया ! .... मुलगी असो....की मुलगा....लग्नानंतर त्यात तेढ येता कामा नये.  प्रत्येक नातं वेगळं असतं...आणि त्यात मिळणारा आनंद हा वेगळा असतो.  कोणतीही गोष्ट तुमच्या control ने होणार नाही.  
आपल्या आजूबाजूला वाहणारा वारा जसा त्याच्या सोयी प्रमाणे इकडे .. तिकडे वाहतो. त्याप्रमाणे आपल्याला...
आपली दिशा बदलावी लागते.  तसेच समोर असणाऱ्या माणसांना आपण control करू शकत नाही.  आपण फक्त स्वतः ला control करू शकतो.  निसर्गाचे किती... छान discipline आहे. मग आपण याबाबतीत मागे का असतो.  
नाण्याच्या दोन बाजू असतात हे आपल्याला माहीत आहे.  नात्याला ही दोन बाजू असतात. पण ही दुसरी बाजू...कोणाला...कधी...पहायची नसते. आपली बाजू ठाम करताना...दुसरी बाजू...आपलीशी केली... तर एक सुंदर प्रेमाचं वलय नक्की तयार होईल. 



















शुक्रवार, २ मे, २०२५

Zen

 Zen म्हणजे काय? असा प्रश्‍न सगळ्यांना पडला असेल.  Zen तत्त्वज्ञान ही बुद्ध धर्मातील एक सुंदर विचारसरणी आहे.  ही विचारसरणी प्रत्यक्ष अनुभव आणि ध्यान....यावर भर देते. Zen चा अर्थ ध्यान असा होतो.  Zen ही एक बौद्ध परंपरा आहे.  या परंपरेत आत्मपरीक्षण आणि ध्यान धारणेतून आपल्याला...आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यात सुधारणा करता येते. 

Zen तत्त्वज्ञान तुम्हाला अगदी छोट्या गोष्टीतून....एक नवा दृष्टिकोन सहज देवून जाते.  तुम्ही जेव्हा नदीत आपलं पहिलं पाऊल टाकता.  त्यानंतर तुमचं दुसरं पाऊल त्याच ठिकाणी ठेवू शकत नाही. नदीचे पाणी हे वाहतं असतं.  त्यामुळे नदीच्या पाण्यात आपण....आपलं पहिलं पाऊल टाकतो. तेव्हा ते पाणी आपल्या पायाला बिलगून पुढे निघून जातं.  पुन्हा कधीच त्या पाण्यात आपण....आपले पाऊल टाकू शकत नाही.  आपल्या आयुष्यात येणारा प्रत्येक क्षण हा असाच आपल्याला स्पर्श करून पुढे निघून जातो.  तो पुन्हा मागे आणता येत नाही. आपल्याला पुढे जावं लागतं. साचून राहिलेलं पाणी हे गढूळ होत जातं. मात्र वाहतं पाणी हे स्वच्छ आणि पारदर्शी राहतं. 

निसर्ग हा आपल्याला सतत.... कसे जगायचे....हे शिकवत असतो.  कधी आपण पाऊल असतो तर कधी आपण पाणी असतो.  कधी स्थिर असतो.  तर कधी अस्थिर....पण तरीही आपण....प्रत्येक क्षणात...नवे असतो. 

Zen म्हणजे काय? तर काहीही धरून ठेवू नका.  सोडून द्या.  श्वासांचा आस्वाद घ्या.  कृतज्ञतेने श्वास घ्या आणि प्रेमाने श्वास सोडून द्या. आपल्या आयुष्यातील अनेक समस्या ध्यान धारणेतून आपण कमी करू शकतो.  खरा आनंद फक्त संपत्ती आणि प्रसिद्धी नाही.  तर तो आपल्या आत आहे.  बौध्द धर्म आपल्याला हेच सांगतो.  तुम्ही इतरांना जितके द्याल.  तितके तुम्हाला मिळेल.  दैनंदिन जीवनात zen मनाला आतून शांत करते.  त्यामुळे आपले मानसिक आरोग्य तर सुधारते पण हल्ली कमी वयात होणारे BP, Stress, Hyper tension, Imunity, Sleeping problem अगदी सहज सुधारतात.  तेव्हा स्वतः साठी आपला zen प्रवास सुरू करा. 




रविवार, ७ जुलै, २०२४

उन्हाळा


शाळेत असताना "माझा आवडता ऋतू " असा निबंध लिहायचा असेल की बरेच जण हिवाळा किंवा पावसाळा या दोन ऋतू बद्दल भरभरून लिहतात.  उन्हाळा हा ऋतू फार कमी जणांना आवडतो.  या ऋतूचे स्वागत सोडा...तो कधी संपेल याची सगळे वाट बघत असतात.  बाहेरचे  उन्हाचे चटके आणि घरातला उकाडा अगदी नकोसा करणारा हा उन्हाळा .... दोन ऋतू मधला एक छान सुवर्णमध्य आहे. एवढे मात्र खरे!

आमच्या वेळी मुलांना शाळेच्या सुट्ट्या लागल्या की समजायचं की उन्हाळी सुट्टी (summer vacation) चालू झाली. हल्ली एप्रिल महिन्यात शाळा चालू  होतात. त्यामुळे मुलांच्या सुट्टीचा कालावधी तसा कमी होत चाललाय. तरीही या सुट्ट्या मध्ये आपण अनेक आवडीच्या आणि सवडीच्या गोष्टी करत असतो. जशा बायका ...वर्षभर पुरवणी साठी....वाळवणीचे अनेक प्रकार करून ठेवतात  तसेच routine life मध्ये करता न....येणार्‍या अनेक मजेशीर गोष्टी करायला.... फक्त या सुट्टीतच खूप वेळ मिळतो. 

हल्ली summer vacation म्हणजे... जग फिरायला जाणारी हौशी family....आणि आमच्या साठी उन्हाळी सुट्टी म्हणजे....मामाच्या गावाला जायचे. आई .... बाबाच्या गावी जाऊन...त्यांच्या बालपणीच्या आठवणीत...त्यांना रमताना बघून...आपण त्यांच्या सोबत असायला हवे होते...असे वाटायचे.  

उन्हाळा आला की तो सोबत चिंच, आंबा, फणस, करवंद  , जांभूळ असा गोड रानमेवा घेवून येतो.  आम्ही आंबा कधी फोडी करून खाल्ला नाही...हलक्या हाताने....पिळून...आधी गोड रसाचा आस्वाद घेत...आंब्याची कोय...आणि त्याची साल...अगदी चाटून...पुसून फस्त करायचो. तांबा...पितळेच्या भांड्याची भातुकली आणि टिंग..टिंग बेल वाजली की धावत जाऊन बर्फाचा रंगीबेरंगी गोळा खाण्याची मजा काही औरच होती. आजोबा आणि आजीचे ज्ञानात भर पाडणारे अनेक किस्से आणि गोष्टीने कान तृप्त होत असत. कवड्या, सापशिडी, कॅरम, नवा व्यापार सारखे घरगुती खेळ... भावंडांमध्ये खेळण्याची मजा आणि त्यावरुन होणारी भांडणे म्हणजे नुसता गोंधळ असायचा. मामाचं घर पाहुण्यांनी फुलून आलं की आम्हा लहानग्यांची रवानगी अंगणात होत असे.  Sun stroke आणि Hit wave असे त्यावेळेस काहीच नव्हते.  मोकळ्या अंगणात, चांदण्याच्या प्रकाशात गप्पा गोष्टींना अगदी उधाण येत असे. 

 लग्न समारंभातील...कुटुंबाचा... प्रेमळ मैत्रीचा सहवास, कोकिळेचे मंत्रमुग्ध स्वर, मामाच्या अंगणातला भारून टाकणारा मोगऱ्याचा सुगंध आणि सुंदर बहरलेला गुलमोहर पाहून कळायचं की फुलण्यासाठी परिस्थिती नाही तर मनस्थिती भक्कम असावी लागते. अशी ही प्रेमळ सहवासाची सुट्टी संपत आली तरी त्याची गोडी आम्हाला वर्षभर पुरायची.

आता हे दिवस हरवत चालले आहेत. Mobile आणि fast food ने माणसांना भुरळ पाडली आहे.  प्रत्येक माणसाचे जग वेगळे झाले आहे.  स्वतंत्र room, गाडी आणि त्यात  A.C. असेल तर एकमेकांच्या room मध्ये जाण्यासाठी...घरातल्या माणसांना....दार ठोठवावे लागते. मना बरोबर room चे दार ही माणसांनी गच्च बंद करून ठेवली आहेत.  म्हणजे आपणच आपल्या भोवती भिंती घालून ठेवल्या आहेत.  ऊन म्हणजे काहीली, झळ असे कुठेतरी मनावर बिंबवले गेले आहे. पण त्यातील  चैतन्य कोणालाच दिसत नाही.  पावसाळा हा नवीन पालवी घेवून येतो, हिवाळा हा उबदार थंडी घेवून येतो आणि उन्हाळा तेजस्वी सूर्य प्रकाश घेवून येतो...निसर्ग आपल्या ऋतु चक्राचा समतोल अगदी छान सांभाळतो.  फक्त माणसाला निसर्गाशी जुळवून घेणे जमत नाही. मग त्याचे खूप उलट...सुलट परिणाम आपल्याला भोगावे लागतात. 

खरं सांगायचं म्हणजे.... कडक उन्हाच्या झळा सोसल्या खेरीज पाहिल्या पावसाचा आनंद नाही घेता येत...आयुष्याच पण असचं आहे ना...उकाडा असह्य झाल्यानंतर वाऱ्याची येणारी हलकीशी झुळूक सुद्धा...आनंद देऊन जाते.  कृत्रिम पणे फक्त...सुखाचा आभास निर्माण करता येतो...सुख नाही.  अशा कृत्रिम सुखाची सवय झाली की...मग...खऱ्या सुखाचा आनंदच घेता येत नाही. 


















गुरुवार, १ फेब्रुवारी, २०२४

कुटुंबवत्सल

भिंती खिडक्या दारे नच घर 
छप्पर सुंदर तेही नच घर 
माणुसकीचे लावी अत्तर!
ते माझे घर! ते माझे घर!

श्रीराम आठवले यांची ही कविता खरचं चिंतन करण्यासारखी आहे. 
प्रत्येकाला हवे असणारे घर हे फक्त चार भिंतीनी नाही तर त्यात राहणार्‍या माणसांनी बनते. सुरक्षिततेची हमी देणारे भर भक्कम छप्पर आणि त्या आधारावर उभ्या असणार्‍या दिलासा, उमेद, जिव्हाळा, प्रेम या चार भिंती....त्यांना असणारी मायेची खिडकी आणि सुखाचे दरवाजे म्हणजे घर ! 🏠
अशा घरात एकत्र नांदणारे सगळे जण हे आपलं ' कुटुंब '
पोटा पाण्यासाठी धावणारे माणसाचे पाय...दिवसभराची दगदग संपली की जिथे घराच्या ओढीने परततात आणि सुखाने स्थिरावतात. ते आपलं घर! जगाच्या कोपर्‍यात कुठेही गेलात आणि आलिशान अशा हॉटेल मध्ये राहिलात तरी घरासारखा आसरा फक्त आपल्या माणसांमधे मिळतो. 

एक कुटुंब आणि अशा अनेक कुटुंब संस्था आपल्या समाज रचनेला मजबूत बनवतात. पूर्वी असणार्‍या एकत्र कुटुंबात तीन पिढ्या गुण्यागोविंदाने.... एकाच घरात रहात असत. त्यामुळे एका पिढीकडून.... दुसर्‍या पिढीकडे...संस्कार आणि आचार विचारांची...देवाणघेवाण आपोआप होत असे. आता अनेक ठिकाणी दिसणारी विभक्त कुटुंब पद्धती....ही घरातल्या माणसाच्या सोयीने तयार झाली आहेत  आणि तसेही... बदल ही काळाची गरज आहे. या बदलत्या जीवनशैली चा परिणाम आपल्या कुटुंब संस्थेवर होताना दिसतो. घटस्फोटाचे आणि एकटे राहणाऱ्यांचे प्रमाण वाढते आहे. Live in relationship, double income...no kid या मतावर ठाम असणारी couples तशी कमी आहे. तरी पण...तो एक नवा trend आहे. त्यामुळेच की काय....आजच्या पिढीला लग्न, मुलं, कुटुंब, नाती यांचे पाश आणि जबाबदारी नको वाटते. 

कुटुंब लहान असो की मोठे .... आपल्याला हसावं वाटलं...तर हसण्याची....रडावं वाटलं तर रडण्याची.... आणि चिडावं वाटलं...तर चिडायची....एकमेव हक्काची...व्यक्त होण्याची... ती एक जागा म्हणजे... आपलं 'कुटुंब 'असते. कुटुंब हा तसा जिव्हाळ्याचा विषय आहे.  आणि जिव्हाळा असला की ते मनाला कुठेतरी भावतं....अशी भावणारी माणसं ही 'कुटुंबवत्सल ' असतात. वात्सल्य हे फक्त स्त्री पुरतं मर्यादीत नसतं. तर कुटुंबा विषयी वत्सलता बाळगणारे पुरुष ही असतात.  आजोबा आणि वडिलांनी आपल्या मुला नातवांना दिलेला दम....हा द्यायलाच हवा.  घरातलं वातावरण आनंदी राहण्यासाठी...अधनं मधनं असा डोस पाहिजे. आपले घर आणि घरातल्या माणसा विषयी ओढ असणारी....अशी ही कुटुंबवत्सल माणसे असतात. अशी भावबंध जपणारी माणसे सोबतीला असतील तर सुखाचे अनेक सोहळे ... उत्साहाने साजरे होतात आणि दुःख ही तितक्याच आवेगाने वाटून घेतले जाते. डोळ्यात गेलेला छोटासा कण काढायला जसा दुसरा कोणीतरी माणूस लागतो. तसेच आयुष्यात आलेले अनेक सुख दुःखाचे क्षण झेलायला माणसे लागतात. स्वतः ची चूक कबूल करण्यासाठी असणारा मनाचा मोठेपणा आणि  समोरच्याची चूक उदारपणे माफ करण्यासाठी असणारे मनाचे औदार्य...या दोन्ही गोष्टी तो आणि ती...कुटुंबवत्सल माणसामध्ये आहेत म्हणून आजवर अनेक घराचे घरपण टिकून आहे. 
तसेही कुणीतरी म्हणून ठेवलंय...
घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती 
इथे असावा प्रेम जिव्हाळा, नकोत नुसती नाती 🏠


 






शुक्रवार, २१ जुलै, २०२३

POST

प्रिय नवरोबा, हे पत्र मी फक्त माझ्या नवर्‍यास लिहीत नसून ... ते  समस्त बायकांच्या नवर्‍यास लिहीत आहे. 

पत्रास कारण की  .......काही नवर्‍यांना त्यांच्या मनातल्या गोष्टी share करायला आवडत नाही.  प्रत्येक नात्या साठी त्यांनी....त्यांच्या मनात compartment तयार केलेले असतात.  मित्र, आई वडिल, बायको, मुले, घर, office असे सगळे sorted असते. या सगळ्यां बरोबर तुम्ही अगदी loyal असता. त्याचे sharing तुम्ही कोणाशीही करत नाही.  आपल्या बायकोशी पण नाही. बायका मात्र ....  जे  decision घेतील त्यात आपल्या नवर्‍याला involved करूनच पुढचे पाऊल टाकतात.  कारण तुमचा खंबीर support त्यांना हवा असतो. निदान....काही महत्त्वाच्या बाबी आमच्या बरोबर share करायला काय  हरकत आहे. अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे का ? असो...

कौटुंबिक जबाबदारी बायको हसतमुखाने पार पाडत असते.  असे अनेक प्रसंग येतात तिच्या समोर जेव्हा तिला तुमची मदतीची गरज असते. पण तरीही तुम्हाला न सांगता ती एकटीच स्वतः सगळे स्वीकारते.  मुलांचे पालन पोषण करत असताना तिचे स्वतः कडे अजिबात लक्ष नसते.  मग असे असताना तुम्ही थोडी तिची काळजी घेतली तर बिघडले कुठे???? जेवताना बाळाने शी ... सू केली तर फक्त आईला का उठावे लागते.  कधी तरी बाबाने... बाळाला स्वच्छ केले तर तिलाही नीट जेवता येईल. आणि तुम्हालाही थोडेसे...आमचे आईपण अनुभवता येईल. असो....

Second baby नंतर तर तिची कामामुळे दमछाक होत असते.  आरामाची नितांत गरज असूनही ती एकहाती सगळे manage करते.  पण जर कधी ती काही kitchen मध्ये काम करत असेल. आणि बाळ रडत असेल तर बाबा सुद्धा अंगाई गीत गाऊन बाळाला गाई...गाई करू शकतात.... कुशीत घेऊन शांत करू शकतात.  बाळाला ही आवडेल की..... बाबाने गायलेले अंगाई गीत ऐकायला. पण काही जण या सगळ्या पासून स्वतः ला अलिप्त ठेवतात आणि आपले मनस्वि बापपण miss out करतात. असो....

व्यवहारातले बायकांना काय कळते ???? या गैरसमजुती वर विश्वास ठेवणारे अनेक नवरे आहेत. त्यामुळे घरातले अनेक मोठे व्यवहार हे त्यांच्या अपरोक्ष होत असतात.  घर खर्चाचे गणित मांडत असताना तिला सतत हिशोबाचे दाखले द्यावे लागतात.  नवर्‍याच्या कष्टांची दखल ही बायको पेक्षा जास्त कोणालाच असू शकत नाही.  त्यामुळे त्यांच्या पैशाचा अपव्यय ती कधीच होऊ देत नाही.  उलट तिला घरखर्चा साठी मिळणाऱ्या रक्कमेची संख्या कमी असो की जास्त.....ती आपल्या घराचे व्यवस्थापन नीट सांभाळते.  याची पावती तिला कधीच मिळत नाही. हा भाग वेगळा... असो....

जिथे प्रेम आहे तिथे भांडण...वाद...रुसवे....फुगवे हे असणारच. तुमच्या ego la सांभाळून आम्हाला..... आमचा स्वाभिमान कधी कधी बाजूला ठेवावा लागतो.  घरातली शांती बिघडू नये ही एकमेव काळजी असल्यामुळे आम्हाला सतत कमीपणा घ्यावा लागतो.  चार पावले पुढे जाऊन हे efforts कधी तरी आपण ही घ्यावेत असे तुम्हाला का वाटत नाही?  हे एक मोठे कोडे आहे.  असो....

घरातला तुमचा वावर हा... kitchen मध्ये मात्र फार कमी असतो. जरा अधून मधून येत जा. त्याच काय आहे ना!...kitchen मध्ये असणार्‍या.... अशा अनेक वस्तू आहेत ....ज्यांना तुमचा सहवास , स्पर्श लाभला नाही. तो कधीतरी त्यांना मिळायला हवा ना!... त्यामुळे ते ही आनंदून जातील... आणि थोडी आपापसात ओळख ही होईल.  असो....

समस्त नवरे मंडळींना माझे एवढेच सांगणे आहे...माणसाच्या आयुष्यात अनेक क्षण येतात.  पण लग्न हा असा क्षण आहे. ज्यामुळे एका व्यक्तीला अर्धांगिनी च्या रुपाने पूर्णत्व येतं. दोघांचे आयुष्य पूर्णपणे बदलून जातं. पण त्याचा भार फक्त एकावर न पडता....त्याचा balance साधता आला पाहिजे. तुम्ही मनातल्या 
सगळ्याच गोष्टी share करायला पाहिजे असे काही नाही हो....पण दोघां मधला संवाद हा नात्या पलीकडे जाऊन...मैत्री चा का असू नये.  

पती आणि पत्नी हे नदीचे दोन काठ असले तरी आपल्या प्रेम आणि विश्वासाचा एक सुंदर brij हा त्या उभयतांनी तयार करायला हवा. संसार हा दोघांचा असतो त्यामुळे एकमेकांवर असणारे जबाबदारीचे ओझे आणि ताण हलका करण्यासाठी....थोडी मदत...थोडी काळजी...थोडासा शब्दाचा आधार हा खूप काही देऊन जातो. आणि पुढचा प्रवास सोपा होवून जातो. असे नाही का वाटत तुम्हाला!

नवरा बायकोच्या भांडणात सगळ्यात जास्त जर काही कारणीभूत असेल तर तो म्हणजे पुरुषी अहंकार...नवर्‍याचे नवरे पण त्याशिवाय अजून पूर्णच होत नाही. आपल्या पुरुष प्रधान संस्कृती मध्ये बायको म्हणजे पायातील चप्पल....तिला डोक्यावर ठेवत नाही असे सुनावले जाते.  ती तुमच्या घरात लक्ष्मी च्या पावलाने येते ना...मग तिला सन्मानाने वागवायला नको का?  खरं म्हणजे...ती तुमच्या आयुष्य चा साथीदार आणि सुख दुःखाची वाटेकरी आहे. आपल्या पत्नीला एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व म्हणून स्विकारले तर संसार सुखी आणि आयुष्य आनंदी राहील. बघा...जमत असेल तर!

मनात साचलेल्या अनेक विचारांना तुमच्या पर्यंत पोचवण्यासाठी आम्हाला या पत्राचा आधार घ्यावा लागला. कारण मनातले भाव....  फक्त शब्दाने post करता येतात.....ते forward होत नाही. 

0




















उसंत

'मनाचा ब्रेक हा उत्तम ब्रेक' असे वाचण्यात आलेच असेल. त्यातला ब्रेक हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. जसा गाडीच्या स्पीडला अधनं मधनं ब्रेकच...